स्वीत्झर्लंडतर्फे “सीएसआर’अंतर्गत निधी : शासकीय संस्थांची मदत घेणार
पुणे – पुण्यातील हवा प्रदूषणाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळेच की काय शहराच्या हवा प्रदूषणाचा शास्त्रीय पद्धतीने सविस्तर अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, “तेरी’ अर्थात “दी एनर्जी ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’, “नीरि’ अर्थात “नॅशनल एन्व्हॉरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’, आणि “एआरएआय’ या संस्था काम करणार असून स्वीत्झर्लंडतर्फे “सीएसआर’अंतर्गत निधी उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरातील प्रदूषणाचे प्रमाण, त्याचे प्रमुख स्रोत, मुख्य प्रदूषके, त्याचे परिणाम आणि आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी मंडळातर्फे “नॅशनल क्लीन एअर प्रोजेक्ट’ या उपक्रमांतर्गत एक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. नुकतीच यासंदर्भातील प्राथमिक बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबतच स्वीत्झर्लंड येथील कंपनीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
याबाबत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर म्हणाले, “पुण्यातील हवा प्रदूषण आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सहा महिन्यांचा असून, लवकरच तो कार्यान्वित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या प्रकारचे किती प्रदूषण होते, याची सविस्तर माहिती संकलित करण्यात येईल. त्याचे तज्ज्ञांकडून विश्लेषण होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकाडून हवेचे नमूने घेण्यात येतील. प्रदूषण मोजणी केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज असल्यास त्यानुसार संख्याही वाढविण्यात येणार आहे. शहरात अशा प्रकल्पाचा प्रथमच प्रयोग केला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.’