रिझर्व्ह बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार
मुंबई: रिझर्व्ह बॅंक यावेळी रेपोदरात पाव टक्के नाहीतर 0.35 टक्क्यांची कपात करण्याची शक्यता आहे. व्याजदरात फक्त पाव टक्का, कपात का करावी असा युक्तिवाद रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी करीत आहेत.
महागाई सध्या नियंत्रणात असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला व्याजदर कपातीची ही शेवटची संधी आहे. त्यानंतर जागतिक व्यापारयुद्ध आणि क्रूड तेलाचे भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला पुढे व्याजदरात कपात करण्यास कमी वाव आहे. यासाठी शेवटच्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंक या दरात पाव टक्क्यापेक्षा जास्त कपात करू शकते.
गेल्या पंधरवड्यात विकास कमी झाल्याची आणि बेकारी वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर बुधवारी सेवा क्षेत्राचा विकास दरही कमी झाल्याची आकडेवारी झाली जाहीर झाली आहे. नवे सरकार जास्तीत जास्त वेगात विकास करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले आहे. त्यामुळे या सरकारला सुरुवातीच्या काही काळात मोठ्या सुधारणा करायच्या आहेत. त्यासाठी भांडवल सुलभतेची गरज आहे. त्यामुळे कमी व्याजदरावर अधिक भांडवल उपलब्ध करण्यावर रिझर्व्ह बॅंकेचा भर राहण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
या अगोदरच्या दोन पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने प्रत्येक वेळी पाव टक्क्यांची कपात केलेली आहे. त्यामुळे आता जर व्याजदर कपात केली तर सलग तीन वेळा व्याजदर कपात केली जाणार आहे. गुरुवारी रिझर्व बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. एप्रिल महिन्यातील घाऊक आणि किरकोळ महागाइचा दर वाढला असला तरी अजूनही तो नियंत्रणात आहे. त्यामुळे यावेळी रिझर्व्ह बॅंक किमान पाच टक्के आणि जास्तीत जास्त अर्धा टक्केपर्यंत व्याज दरात कपात करू शकते, असे बऱ्याच विश्लेषकांनी या अगोदरच सांगितले आहे.