नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा अमरनाथ यात्रेनंतर केली जाणार आहे. त्या यात्रेचा प्रारंभ पुढील महिन्यात होईल. अमरनाथ यात्रा साधारणपणे 2 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत होते. त्यामुळे ऑगस्टच्या उत्तरार्धात जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया संपल्याने आता जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. त्या राज्यात काही महिन्यांपूर्वी पीडीपी आणि भाजप युतीचे सरकार होते. मात्र, भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने पीडीपीच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आता ती कधी मागे घेतली जाणार आणि विधानसभा निवडणूक केव्हा होणार याविषयी जम्मू-काश्मीरबरोबरच देशभरात उत्सुकता आहे.