सप, बसप, राजदचे दुकान 2020 पर्यंत बंद होईल – पासवान

नवी दिल्ली – सप आणि बसप या पक्षांनी एकला चलो रेचा नारा दिल्यानंतर त्यांची खिल्ली उडवण्याची आयतीच संधी सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे. केंद्रीय मंत्री आणि लोजपचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी तर सप, बसप आणि राजदसारख्या पक्षांना त्यांचे दुकान 2020 पर्यंत बंद करावे लागेल, असे भाकीत करून टाकले आहे.

सप आणि बसपमधील हातमिळवणी म्हणजे महाआघाडी नव्हे तर महाबिघाडी होती. त्यामुळे त्यांच्यातील ताटातूट अटळ होती. विरोधकांची उत्तरप्रदेशातील महाआघाडी विखुरली. बिहारमध्येही तसेच घडत आहे. संपूर्ण देशातच विरोधकांमध्ये फाटाफूट होईल, असे पासवान येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून सप, बसपसारखे विरोधी पक्ष पुन्हा एकट्याच्या बळावर लढण्याच्या निर्णयापर्यंत येऊन ठेपले आहेत. त्यातून विरोधकांची स्थिती आणखीच बिकट होणार असल्याचे पासवान यांनी एकप्रकारे त्यांच्या वक्तव्यातून सूचित केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.