बाजारात दुप्पट आवक : रत्नागिरी, कर्नाटक हापूसची आवक घटली
पुणे – रत्नागिरी, कर्नाटक हापूसची आवक घटली आहे. तर, दुसरीकडे नागरिक आतुरतेने वाट पाहणाऱ्या गावरान आंब्याची आवक वाढली आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत गावरान आंब्याची आवक दुप्पटीने वाढली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक सुरू राहणार आहे. रत्नागिरी हापूसचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर कर्नाटक हापूसच्या भावात अल्पशी घट झाली आहे. गावरान, पायरीला डझनाला अनुक्रमे 200 ते 225 रुपये आणि 100 ते 125 रुपये भाव मिळत असल्याची माहिती यशवंत ऊर्फ तात्या कोंडे यांनी दिली.
रत्नागिरी हापूसविषयी व्यापारी युवराज काची म्हणाले, मागील आठवड्याच्या तुलनेत आवक घटली आहे. गेल्या आठवड्यात तीन ते साडेतीन हजार पेटी आवक होत होती. ती रविवारी (दि. 2 जून) 700 ते 800 पेटी झाली आहे. येत्या काळात तुरळक प्रमाणात आवक सुरू राहणार आहे. पुढील दहा ते पंधरा दिवस आवक सुरू राहील.
व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची आवक होत आहे. जरी आवक घटली असली, तरीही भावात कोणताही बदल झालेला नाही. भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गोड, दर्जेदार रत्नागिरी तयार हापूस बाजारात उपलब्ध आहे. कर्नाटक हापूसविषयी व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, कर्नाटक हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. पुढील दहा दिवस आंब्याची आवक राहणार आहे. गेल्या आठवड्यात 15 ते 16 हजार पेटी आवक झाली होती. ज्यामध्ये घट होऊन रविवारी (दि.2 जून) 10 ते 12 हजार पेटी आवक झाली. आवक घटली असली तरीही मागणी अभावी हापूसच्या भावातही अल्पशी घट झाली आहे. पायरीलाही अपेक्षित मागणी नाही. नागरिक आता गावरान हापूस खरेदी करू लागले आहेत. गावरान आंब्याचे व्यापारी यशवंत ऊर्फ तात्या कोंडे म्हणाले, येत्या काळात गावरान हापूसची आवक वाढेल. सध्या मुळशी तालुक्यातून मोठी आवक होत आहे. भोर, वेल्हा तालुक्यांतून नगण्य आवक झाली आहे. काही दिवसांत भोर, वेल्हा येथून मोठी आवक होण्यास सुरुवात येईल.