महापालिकेची कारवाई : 37 हजार 500 रुपये दंड वसूल
पुणे – कचरा न जिरवणाऱ्या सोसायट्या, हॉटेल्स आणि मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले असून, कारवाईला सुरुवात देखील केली आहे. त्यानुसार सोमवारपासून 10 मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाई करून 37 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.
शहरातील सर्व सोसायट्या, हॉटेल्स आणि इतर मोठ्या आस्थापनांनी निर्माण होणारा ओला कचरा आपल्याच परिसरात जिरविणे बंधनकारक आहे. यासंदर्भात वारंवार पत्रे देऊनही कार्यवाही न करणाऱ्यांवर आता महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या अंतर्गत मंगल कार्यालयांपासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सुरुवात केली. त्यानुसार दोनच दिवसात 10 मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाई अंतर्गत महापालिका प्रशासनाने सोमवारपासून शहरातील मंगल कार्यालयांची तपासणी करून कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत सोमवारी औंध-बाणेर, कोथरुड-बावधन या दोन क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक आणि कोंढवा – येवलेवाडी कार्यालयांतर्गत दोन मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 15 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगळवारी शिवाजीनगर-घोले रस्ता आणि येरवडा-कळस कार्यालयांतर्गंत प्रत्येकी एक आणि हडपसर-मुंढवा कार्यालयांतर्गत चार मंगल कार्यालयांवर कारवाई करून 22 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.