हरकती आणि सूचना घ्याव्यात
महापालिकेकडून नागरिकांच्या माहितीसाठी “ईएलयू’ जाहीर केला जाणार असला, तरी त्यावरही हरकती आणि सूचना घेण्यात याव्यात अशी मागणी केसकर यांनी केली आहे. “ईएलयू’ जाहीर केल्यानंतर त्यात काही चुका असल्यास नागरिकांना त्या हरकती द्वारे मांडता येतील. त्यामुळे त्यावरही हरकती व सूचना घ्याव्यात, अशी मागणी केसकर यांनी केली आहे.
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून त्यांच्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. महापालिकेच्या धर्तीवर पीएमआरडीएनेसुद्धा या आराखड्याचा प्रत्यक्ष जागा वापर (ईएलयू- एक्झिस्टिंग लॅन्ड युज) जाहीर करावा, अशी मागणी आपले पुणे या संस्थेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे विकास आराखड्यात पारदर्शकता येणार असून त्याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी तो जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
हद्दीत समाविष्ट 11 गावांचा विकास आराखडा करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी या गावांच्या प्रत्यक्ष जागा वापर (ईएलयू)चे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून हा “ईएलयू’ नागरिकांसाठी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या 2007 ते 2027 च्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याचा “इएलयू’ अर्धवट असल्याने जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता.
यावेळी संस्थेने महापालिकेने “ईएलयू’ जाहीर न करातच थेट संभाव्य जागा वापर (पीएलयू-प्रपोज्ड लॅन्ड युज) जाहीर केला असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, आता त्या आराखड्यास मान्यता मिळालेली असून महापालिकेने 11 गावांचा “ईएलयू’ जाहीर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे समितीने स्वागत केले आहे. तर पीएमआरडीएकडूनही “डीपी’ तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन नागरिकांना माहिती व्हावी म्हणून “ईएलयू’ जाहीर करावा, अशी मागणी संस्थेचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी पत्राद्वारे केली.