न्यू यॉर्क – अमॅझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफरद्वारे स्वतः अमॅझॉनच आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःचा स्टार्टअप सुरु करण्यासाठी मदत करणार असून यासाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अमॅझॉनमधील आपला जॉब सोडण्याची देखील मुभा दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमॅझॉनने ऑनलाईन शॉपिंग व्यवसायाला अधिक गतिमान बनविण्याचा विडा उचलला असून आपल्या ‘प्राईम’ ग्राहकांना एका दिवसामध्ये डिलिव्हरी देता यावी यासाठी कंपनीने एक नवा फंडा आजमावला आहे.
अमॅझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ केलेल्या ऑफरनुसार कर्मचाऱ्यांना त्यांचा अमॅझॉनमधील जॉब सोडावा लागणार असून त्यांना अमॅझॉनचे प्रोडक्ट्स डिलिव्हरी करणारा स्टार्टअप उभारावा लागणार आहे. सदर कर्मचाऱ्यांना आपला स्टार्टअप उघडण्यासाठी अमॅझॉनतर्फे मदत देखील पुरवण्यात येणार असून या कर्मचाऱ्यांना अमॅझॉन आर्थिक साहाय्य म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या पगाराएवढी रक्कम प्रोत्साहन म्हणून देऊ करणार आहे. एवढंच नाही तर अमॅझॉनतर्फे कर्मचाऱ्यांच्या स्टार्टअप उघडण्यासाठीच्या एकूण खर्चापैकी १०,००० यूएस डॉलर्सचा खर्च उचलला जाणार आहे.