पुणे – शहरात दोन अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कल्याणीनगर परिसरात भरधाव कारने एका दुचाकीस्वारास उडविले. त्यामध्ये त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. मात्र, हेल्मेट परिधान केलेले असल्याने त्याचा जीव वाचला.
कल्याणीनगर येथील जर्मन बेकरी हॉटेलजवळ अपघाताची पहिली घटना घडली. यामध्ये फिर्यादी अतुल गिरी ( रा. हरीगंगा सोसायटी, येरवडा) हे गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून राहत्या घरापासून ऍडलॅब चौकाकडे जात असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली. यामध्ये त्यांचे डाव्या पाय फ्रॅक्चर झाला आहे. फिर्यादी यांनी हेल्मेट परिधान केले होते. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात येरवडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत हरिष जगताप ( रा. रामटेकडी) हे दुचाकीवरून जात असताना भरधाव आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. हांडेवाडी रोडवर ससाणेनगर परिसरातील तुळजाभवानी मंगल कार्यालयासमोर हा अपघात झाला. त्यामध्ये हरिष यांच्या पायास मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून धडक देऊन फरार झालेल्या दुचाकीस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत.