अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झाला संयुक्त राष्ट्राने सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऍडव्होकेट म्हणून घोषित केले आहे. अभिनेता फॉरेस्ट व्हिटकर, बेल्जियमच्या महाराणी मिथिल्डे आणि नॉर्वेतील पंतप्रधान एर्ना सोल्बर्ग यांनी मिळून दिल्याला “सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’साठी ऍडव्होकेट म्हणून नियुक्त केले आहे. पर्यावरणाबाबतच्या आपल्या कर्तव्यांबाबत दिया नेहमीच सतर्क राहिलेली आहे. एकोफ्रेन्डली लाईफ स्टाईल स्वीकारण्यासाठी ती लोकांमध्ये जागरुकताही निर्माण करत असते.
2017 मध्ये दिया मिर्झाला संयुक्त राष्ट्राची गुड वील ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर दियाने निसर्ग संवर्धनाचे आपले कर्तव्य अधिकच गांभीर्याने घेतले आणि खास अभियान राबवून तिने लोकांपर्यंत निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचवला. संयुक्त राष्ट्राकडून “सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ची ऍडव्होकेट म्हणून नियुक्ती झाल्याने स्वतःचा बहुमान झाला असल्यासारखे वाटते आहे.
माध्यमांमधून स्थायी विकासाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तिने आपल्या मनोगतात सांगितले. पर्यावरणाचे ऍडव्होकेट या नात्याने दिया पर्यावरण संरक्षण आणि बालकांच्या अधिकारांवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे. तिच्यासह अलिबाबा ट्रेड पोर्टलचे जॅक मा आणि अन्य 17 प्रसिद्ध व्यक्तींना संयुक्त राष्ट्राने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचे ऍडव्होकेट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.