पिंपरी – पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावून दोनजण पळत होते. यावेळी तरुणाने पाठलाग करुन एका चोरट्याला पकडले व भोसरी पोलिसांच्या हवाली केले आहे. ही घटना भोसरी येथे रविवारी (दि.31 मार्च) रात्री घडली. महेश बापू कांबळे (वय-22, रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजकुमार भवाने कामी-बिके (रा. खान्देशनगर, मोशी. मूळगाव नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार दिनेश बिके (रा. पिंपरी) हा पळून गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कामावरून पायी घरी जात असताना कानात हेडफोन लावण्यासाठी माने क्रेन सर्व्हिसच्या कार्यालयासमोर थांबले होते. त्यावेळी तिथे दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या हातातील 19 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावला.
यामुळे फिर्यादी कांबळे यांनी पाठलाग करून आरोपी राजकुमार याला पकडले. तर दुसरा आरोपी दिनेश बिके हा दुचाकीवरून पळून गेला. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.