वीसगाव खोरे (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हे-मुळशी या विधानसभा मतदारसंघांची मतदार संख्या २०१९ मध्ये ३ लाख ५४ हजार ५७७ इतकी होती. यामध्ये १ लाख ८७ हजार २२१ पुरुष आणि १ लाख ६७ हजार ३५२ महिला मतदारांचा समावेश आहे.
भोर तालुक्यात सर्वाधिक १ लाख ५७ हजार ७०८ मतदार असून मुळशीत १ लाख ४७ हजार २२६ तर वेल्ह्यात सर्वात कमी ४९ हजार ६४५ मतदार होते. यात मागील पंचवार्षिकपेक्षा यंदा नवमतदारांची संख्या वाढली असून तो मतदारच निर्णायक ठरेल, अशी शक्यता आकडेवारीने निर्माण झाली आहे.
संख्या त्रेचाळीस हजारांपेक्षा जास्त…
२०१९ लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४३ हजार २६८ इतकी नवमतदार संख्या वाढली आहे. भोर विधानसभा मतदारसंघ ११ टक्के नवमतदारांनी नोंद केली आहे. भोर तालुक्यात ३ हजार ३७९,राजगड तालुक्यात १ हजार ९६४,तर मुळशी तालुक्यात ३७ हजार ९२३ मतदार संख्या वाढली आहे. या ४३ हजार २६८ नवमतदारांचा प्रभाव हा निवडणुकीवर होणार आहे.
भोर तालुक्यापेक्षा शहरालगत असलेल्या मुळशी तालुक्यातील तरुण मतदारांनी नोंदणी करून निवडणूक प्रक्रियेत रस दाखवला आहे. तरुण मतदारांची संख्या वाढल्यामुळे राजकीय पक्षांना त्याची दखल घ्यावी लागणार असून राजकीय पक्षांना जाहीरनाम्यात युवकांशी संबंधित रोजगार, शिक्षण या प्रश्नांना या वेळी लक्ष केंद्रित करावी लागणार आहे.
२०२४ मध्ये १ लाख ६१ हजार ०८७ असून पुरुष मतदार ८२ हजार ०६३, महिला मतदार ७९०२३, राजगड तालुक्यात ५१हजार ६०९ यात पुरुष मतदार २७ हजार १४१, महिला मतदार २४ हजार ४६७ आहेत. मुळशी तालुक्यातील एकूण मतदार १ लाख ८५ हजार १४९ असून पुरुष मतदार १ लाख २ हजार २४१, महिला मतदार ८२ हजार ९०५ आहेत.
भोर विधानसभा मतदारसंघांची मतदार संख्या ३ लाख ९७ हजार ८४५ इतकी झाली आहे. यात पुरुष मतदार २ लाख ११ हजार ४४५, महिला मतदार १ लाख ८६ हजार ३९५ तसेच ९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करण्यात आल्याने यात वाढ होऊ शकते.