भोर, (प्रतिनिधी) – भोर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोर, वेल्हे व मुळशी या भोर विधानसभा मतदारसंघांत ६०.११ टक्के मतदान झाले आहे. भोर, वेल्हे तालुक्यांत औद्योगिक वसाहत, तीन धरणांचे पाणी आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकास यावर आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
वाढलेल्या तरुण मतदारांसह मागच्या वर्षी ६०.८० टक्के यावर्षीच्या तुलनेत ०.६९ टक्के कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याविषयी खमंग चर्चा सुरू आहेत. त्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या मनात नक्की काय आहे, आणि कोणाला पसंती दिलेली आहे. हे मात्र ४ जूनलाच स्पष्ट होणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांच्यासोबत असलेले जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, माजी जि.प. सदस्य चंद्रकांत बाठे, तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, निर्मला जागडे, किरण राऊत, माजी जि.प. सदस्य शांताराम इंगवले, नेते राजेंद्र हगवणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते अजित पवार गटात सहभागी झाले.
तर माजी जि.प. सदस्य कुलदीप कोंडे यांनी शिंदे गटात प्रवेश करून अजित पवारांना साथ दिली. तर शिंदे गटाचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे, जिल्हाप्रमुख बाळासो. चांदेरे, भाजपचे भोर विधानसभाप्रमुख किरण दगडे-पाटील, तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी सुनेत्रा पवार यांचेच काम केले, तर भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यांत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी खा. सुळे यांची प्रचार यंत्रणा यशस्वीपणे राबवली आणि काँग्रेसने प्रामाणिकपणे शरद पवार गटाचे काम केले.
त्यांना हाताच्या बोटावर मोजण्याइतके असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गटाने साथ दिली. याचा अर्थ ते भोर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे यांच्यावरच खा. सुळे यांचे मताधिक्य अवलंबून आहे.
शहरी भाग भाजपकडे
राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि त्यानंतर लागलेली लोकसभा निवडणूक यामुळे भोर विधानसभा मतदारसंघातील अनेक नेते अजित पवारांबरोबर गेले, तर थोड्याफार प्रमाणात नेते शरद पवार यांच्यासोबत राहिले. मात्र, ज्येष्ठ मंडळी शरद पवार यांना मानणारी आहेत. तर तरुणवर्ग अजित पवारांना व पुणे शहरी भागातील मतदार भाग भाजपला मानणारा असल्याचे बोलले जात आहे.
भौर, वेल्हे तालुक्यांत मोठ्या प्रमाणात असलेला रोजगाराचा प्रश्न, तीन धरणे असूनही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो.
पर्यटन दृष्टीने विकास यांच्यासह निवडणुकीच्या तोंडावर औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) प्रश्न चांगलाच तापला आणि तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.तरुण सुशिक्षित बेरोजगार मतदारांनी जो पक्ष एमआयडीसी करेल त्यालाच मतदान करणार, असा पवित्रा घेतला होता. यामुळे तरुण मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे गेला यावरही मताधिक्य अवलंबून आहे.
२००९ पासून सुळेंचे प्रतिनिधित्व
निवडणुकीत शरद पवारांकडून भावनिक साद घालण्यात आली. पवारांची शेवटची निवडणूक असल्याचे सांगण्यात आले. तर अजित पवार यांच्याकडून विकासाच्या मुद्यावर प्रचार केला गेला. सुप्रिया सुळे यांना काँग्रेस आणि उबाठा गटाने चांगली साथ देत प्रचार केला, तर भाजप आणि शिंदे गटाने सुनेत्रा पवार यांचा जोरदार प्रचार केला आणि भविष्यात विकासाच्या मुद्यावर मतदान करण्याचे आवाहन केले. अजित पवार आमदार, संग्राम थोपटे व खा. सुप्रिया सुळे यांनी मोठ्या प्रमाणात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.
१०९३७० महिला मतदार
१३५८४४ पुरुष मतदार
४०७९२१ एकूण मतदार
२५५२१५ झालेले मतदान
सुप्रिया सुळे यांची हॅटट्रिक ?
पूर्वी भोर विधानसभा मतदारसंघ खेड लोकसभा मतदार संघात होता तेव्हा काँग्रेस व नंतर राष्ट्रवादीकडून अशोक मोहोळ खासदार होते. शिवाजीराव आढळराव यांचा एक अपवाद वगळता आतापर्यंत भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार भोर विधानसभा मतदार संघात विजयी झालेला नाही.
बारामती लोकसभेत भोर विधानसभेचा समावेशानंतर २००९ पासून आतापर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकून हॅटट्रिक केली असून, सध्या चौकार मारणार का? वाची उत्सुकता मतदार संघात आहे.
झालेले मतदान ६०.११ %
२०१९ ला भोरचे मताधिक्य
भोर विधानसभेने खासदार सुळेंना १९२६३ मताधिक्य दिले होते.
१०९१६३ सुप्रिया सुळे
कांचन कुल यांना 90000 मते मिळाली होती.