चिखली, (वार्ताहर) – चोविसावाडी चर्होली येथे पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आरक्षित जागेवर कचरा संकलन केंद्राचे काम सुरू करण्याचे प्रयोजित आहे. या कचरा संकलन केंद्राच्या शेजारीच तनिष ऑर्चिड फेज -1, तनिष ऑर्चिड फेज -2, डेस्टिनेशन ओशियान, ग्लोबल हाईट या आणि इतर सहकारी गृह रचना संस्था आहेत.
हा सर्व रहिवासी परिसर असून या भागामध्ये 30 पेक्षा जास्त सहकारी गृहरचना संस्था आहेत. त्यामुळे येथील कचरा संकलन प्रकल्पाचे काम बंद करण्याची मागणी नागरिक व चिखली-मोशी-चर्होली हाउसिंग फेडरेशनच्या वतीने केली आहे.
दहा ते पंधरा हजार सोसायटीधारक या ठिकाणी राहतात. आपल्या या प्रायोजित कचरा संकलन केंद्रामुळे या भागामध्ये असणार्या सर्व नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन साथीचे आजार पसरू शकतात, त्याचप्रमाणे महापालिकेच्या वाहनांची जास्त प्रमाणात ये-जा वाढून या भागातील सर्व सोसायटीधारकांना याचा खूप मोठे प्रमाणात त्रास होऊ शकतो.
त्यामुळे रहिवासी भागामध्ये कचरा संकलन केंद्र करण्यास फेडरेशनचा व नागरिकांचा विरोध आहे. जर केंद्र सुरू केले तर या भागातील सर्व सोसायटीधारकांना एकत्र घेऊन महापालिकेविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चिखली-मोशी-चर्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.