पुणे : मोबाइलवर काढलेली चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या प्रियकराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विशाल केरबा मोतीरावे (रा. उदगीर, लातूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
तक्रारदार महिला सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहे. आरोपी विशालचे महिलेशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून त्याने नकळत मोबाइलवर चित्रीकरण केले. महिलेच्या नावे समाजमाध्यमात बनावट खाते तयार केले.
महिलेची छायाचित्रे, चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. महिलेने घाबरून त्याला ऑनलाइन पद्धतीने चार हजार रुपये पाठविले.
उर्वरित रक्कम न दिल्यास चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. आरोपीने दिलेल्या त्रासामुळे महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस निरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.