IPL 2024 (DC vs KKR Match 16) Rishabh Pant Fined : आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी आतापर्यंत काहीही चांगले झालेले नाही. संघाने आतापर्यंत चार सामन्यापैकी तीन सामने गमावले आहेत. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सला 106 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतलाही 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात…
बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी आयपीएलने (BCCI) दिल्ली कॅपिटल्सला दंड ठोठावला. या मोसमात दिल्लीने दुसऱ्यांदा ही चूक केली आहे. त्यामुळे कर्णधार ऋषभ पंतवर 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या उर्वरित खेळाडूंना म्हणजेच खेळणाऱ्या 11 आणि इम्पॅक्ट खेळाडूनाही दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येक खेळाडूला 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25 टक्के दंड भरावा लागेल.
इंडियन प्रीमियर लीगने एक निवेदन जारी केले की, “दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात स्लो ओव्हररेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या या मोसमातील आचारसंहितेअंतर्गत संघाचा हा दुसरा गुन्हा होता, त्यामुळे पंतला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित खेळाडूंना मॅच फीच्या 25 टक्के किंवा 6 लाख रुपये यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.”
काय आहे नियम…
स्लो ओव्हर रेटच्या नियमांनुसार, ही चूक पहिल्यादा झाल्यास कर्णधाराला केवळ 12 लाख रुपयांचा दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधाराला 24 लाखांचा दंड तर संघातील इतर खेळाडूंनाही 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात येतो.
तिसऱ्यांदा ही चूक केल्यावर कर्णधारावर 30 लाख रुपयांसह एका सामन्याची बंदी घालण्यात येते, यासोबतच संघातील उर्वरित खेळाडूंना प्रत्येकी 12 लाख रुपये किंवा 50 टक्के दंड आकारण्यात येतो. अशा परिस्थितीत पंतने या हंगामात दोनदा ही चूक केली आहे, जर तो आणखी एकदा स्लो ओव्हर रेटमध्ये पकडला गेला तर त्याच्यावर 1 सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.