पिंपरी, (प्रतिनिधी) – भारतीय हवाई क्षेत्रात येत्या दोन वर्षात हजारो विमानांचा ताफा दाखल होत असून लाखो नोकऱ्यांची संधीही उपलब्ध झाली आहे. त्या अनुषंगाने इंदिरा संस्थेने पुढचे पाऊल टाकत उंच आकाशी झेप घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देत नोकऱ्या देणार असल्याचे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर यांनी ताथवडे येथे केले.
श्री चाणक्य एज्यूकेशन सोसायटीच्या इंदिरा शिक्षण समूहाने इंदिरा स्कुल ऑफ एव्हिएशन हे महाविदियालय सुरु केल्याची माहिती डॉ. तरिता शंकर यांनी बुधवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंडीत माळी, इंदिरा स्कुल ऑफ एव्हीएशनच्या संचालिका नीतू रोशा, अभय अहिरे, रिचा मल्होत्रा उपस्थित होते.
डॉ. तरीता शंकर पुढे म्हणाल्या, देशभरात विमानतळांची संख्या वाढत आहे. तसे मनुष्यबळाची मागणी वाढणार आहे त्यादृष्टीने कुशल मनुष्यबळ आम्ही इंडस्ट्रीला देणार आहोत. रोशा यांनी सांगितले की, संस्थेने अनेक हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत करार केले असून ही संख्या वाढणार आहे. ग्राउंड स्टाफ पासून ते पायलट प्रशिक्षणापर्यंत सर्व अभ्यासक्रम आम्ही देणार आहोत.
केबिन क्रू, विविध वैमानिक, विमानतळावर लागणारा स्टाफ असे प्रशिक्षण येथे देण्यात येणार असून कॅम्पसमध्ये प्रॅक्टिकलसाठी आधुनिक उपकरणे, आर्टिफिशल विमान असून सर्व सुविधा पुरविण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्याचे सांगण्यात आले.