सोनई ( वार्ताहर) – सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील व वाड्या- वस्त्यावरील अवैद्य धंद्यावर सध्या पोलिसांकडून छापेमारी सुरू असून, यात गावठी दारू व इतर धंद्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याउलट सोनई गावामध्ये अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाला असून, सोनई पोलीस बघ्याची भूमिका का घेतात हे न समजणारे कोडे आहे.
बसस्थानक परिसरात राजरोसपणे गांजाची विक्री होत असून गांजा पिणाऱ्यांचे टोळके बसस्थानक परिसरात बसलेले दिसून येतात, ही बाब पोलिसाच्या नजरेतून सुटत आहे. घोडेगाव, लोहगाव, खेडले परमानंद, चांदा, मांडे मोरगव्हाण आदी गावात सोनई पोलीस ठाण्याकडून छापेमारी करून येथील गावठी दारूचे गुत्ते उद्ध्वस्त केले आहे.
मात्र, इतर धंदे खुलेआमपणे सुरू आहे. केवळ गावठी दारूच्या धंद्यावर छापा मारून इतर धंदे का बंद केले जात नाहीत, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गावागावांत वाड्या-वस्त्यांवर जुगारीचे अड्डे व मटका चालू असताना कारवाई केली जात नाही. सोनई गावामध्ये काही ठराविक धंद्यावर कारवाई केली जाते.
गावात चौकाचौकांत मटक्याच्या टपऱ्या, जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्याचबरोबर गावठी दारूचा महापूर आलेला असताना इतर गावांत कारवाई करण्यापेक्षा आधी सोनई गावातीलच हे धंदे बंद करण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. चौकाचौकात मटका, जुगाराचे अड्डे सुरू असताना याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. गुटखा, मावा खुलेआमपणे विकला जात असताना यावर कधी कारवाई केल्याचे ऐकवत नाही. सोनई गावातील धंद्यावर पोलीस एवढे मेहबान का ॽ असा प्रश्न उपस्थित होत आहे.