अहमदाबाद – गुजरातमधील कॉंग्रेसचे उमेदवार रोहन गुप्ता यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यांची मैदान सोडण्याची तडकाफडकी कृती कॉंग्रेससाठी मोठा हादरा ठरली आहे. (Congress candidate Rohan Gupta withdraws nomination from Ahmedabad East Lok Sabha seat)
कॉंग्रेसने आपले राष्ट्रीय प्रवक्ते गुप्ता यांना अहमदाबाद पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी सोमवारी रात्री सोशल मीडियावरून निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. त्यासाठी त्यांनी वडिलांच्या प्रकृतीचे कारण दिले. गुप्ता यांची माघार चर्चेचा विषय बनल्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली.
मी निवडणूक लढवू नये अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे. त्यांच्यावर १६ मार्चपासून आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. मी सक्रिय राजकारणात उतरल्याने माझे काहीतरी वाईट होईल या भीतीने त्यांना ग्रासले आहे. निवडणूक न लढवण्याची लेखी हमी त्यांनी माझ्याकडून मागवली.
माझ्याशी बोलताना त्यांची काही काळ शुद्धही हरपली. त्यामुळे निवडणुकीतून माघार घेण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्यापुढे उरला नाही, असे गुप्ता म्हणाले. त्यांची माघार धक्कादायक असल्याचे गुजरात कॉंग्रेसने म्हटले. गुप्ता यांनी माघार घेतलेल्या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार हसमुख पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मागील वेळी पटेल यांनी ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.