पुणे – कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात आत्महत्या केलेल्या तरुणीचा मृतदेह रविवारी सकाळी बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सुनैना सुनील मुंडे (२५ ,राहणार राजस सोसायटी, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने शहरातील एका प्रसिध्द बांधकाम व्यवसायीकाकडे तसेच वकिलाकडे काही काळ काम केले आहे. तिने विधी शाखेची पदवी घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाला तलावात एका महिलेने उडी मारल्याची खबर मिळाली. त्यानंतर लगेचच कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांकडून व पोलिसांकडून तलावात बोटीच्या साहाय्याने दोन ते तीन तास शोध घेण्यात आला.
परंतु रात्रीच्या वेळी अंधारात मृतदेह मिळून आला नाही. त्यामुळे अग्निशमन दला कडून सकाळी सात वाजता पुन्हा शोध घेण्यात आला. शोध मोहिमे दरम्यान मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना तिची ओळख पटली. ती राजस सोसायटी येथे मामाकडे रहात असल्याचे समजले. यानंतर तिच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान, तिने आत्महत्या करण्यापूर्वी भावाबरोबर फोनवर बोलणे झाले होते. मात्र अद्याप तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.