मॉस्को – व्हॅक्यूम बॉम्बचा वापर करून युक्रेनचे खूप सैनिक मारल्याचा दावा रशियाच्या सैन्य दलाने केला आहे. हा बॉम्ब ज्या भागात टाकला जातो, त्या भागातील जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात काढून घेतला जातो. यामुळे श्वासोच्छवास न करता आल्यामुळे सजीवांचा मृत्यू होतो, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रशियाच्या सैन्य दलाच्या डेप्युटी चीफ ऑफ आर्म्ड फोर्सेसच्यावतीने रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेइ शोयगू यांना ही माहिती दिली. या बॉम्बच्या वापरामुळे युक्रेनचे किमान ३०० सैनिक ठार झाल्याचे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. युक्रेनने मात्र जीवितहानी झालेल्या सैनिकांचा नेमका आकडा प्रसिद्ध केलेला नाही.
हा बॉम्ब नेमका कोठे टाकला गेला, याची माहितीही युक्रेनच्या गुप्तचर विभागाने दिलेली नाही. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्याच्या वेळी अशा प्रकारचा बॉम्ब वापरल्याच्या वृत्ताला मात्र दुजोरा दिला गेला आहे.
दरम्यान रशियाच्या विमानांनी जोरदार बॉम्बफेक केल्यामुळे युक्रेनमधील सरे भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर केले जाऊ लागले आहे. गेल्या २४ तासात २२ गावांमधील ४, ५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
निर्वात पोकळीमुळे श्वसन अशक्य…
व्हॅक्यूम बॉम्बलाच वोल्ह्युमेट्रीक वेपन असे म्हटले जाते. या बॉम्बच्या स्फोटामुळे वातावरणात इंधनाची वाफ पसरल्यामुळे ऑक्सिजन निघून जातो. त्यांमुळे श्वास घेणे अशक्य होते. या बॉम्बच्या स्फोटामुळे इमारती पडू शकतात आणि अवयव निकामी होऊ शकतात.
निर्वात पोकळी निर्माण झाल्यामुळे गुहां आणि भिंतीही सुरक्षित राहू शकत नाहीत, असे न्यूयॉर्क येथील यूएस मिलिटरी अकादमीमध्ये कायदा आणि युद्धासाठी लिबर इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.