सासवड, (प्रतिनिधी) – नियमित पीककर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांबाबत शासनाने 14 मार्च 2024 रोजी परीपत्रक काढून खरीप हंगामातील पीककर्जाच्या व्याजात सवलत देऊन केवळ मुद्दल भरण्याबाबत सांगितले आहे.
त्यामुळे पुरंदर तालुक्यातील नियमित पीककर्ज भरणार्या शेतकर्यांनी आता फक्त पीककर्जाची मुद्दल भरावी, असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे. यामुळे सध्याच्या दुष्काळी परीस्थितीत शासनाकडून शेतकर्यांना व्याज सवलतीचा दिलासा मिळाला आहे.
याबाबत जिल्हा बँकेचे संचालक, आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यातील सर्व विकास सोसायट्यांचे सचिव, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे तसेच जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे यांसह बँकेचे सर्व विकास अधिकारी, वसुली अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन ही माहिती दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पुरंदर तालुक्यातील 97 विकास सोसायट्यांच्या माध्यमातून फेब्रुवारी 2024 अखेर 27 हजार 724 शेतकरी सभासदांना 24 हजार 577 हेक्टर क्षेत्रावर 223 कोटी 69 लाख 51 हजार रुपयांचे पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी दिली.