भोर, (प्रतिनिधी)- भोर नगरपरिषदेची अनेक विकासकामे होत असताना भोर नगरीचे प्रवेशद्वाराजवळ राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक आहे, बसस्थानकाची इमारत ही जुनी व जीर्ण झाल्याने पावसाळ्यात गळतीमुळे प्रवाशांची कुचंबणा होत होती. मध्यवर्ती ठिकाणी असलेली जुनी इमारत पाडण्यात येवून त्या ठिकाणी सुसज्ज अशी नवीन प्रशस्त इमारत बांधकाम करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर शहराच्या विकासकामाकडे प्राधान्य देऊन नगरपरिषदेचा सर्वागीण विकास करणार असल्याचे आमदार थोपटे यांनी यावेळी सांगितले. भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते भोर नगरपरिषदेच्या माध्यमातून मंजूर केलेल्या भोर शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन करण्यात आले.
यात भोर एस. टी. स्टॅड येथे बांधकाम १ कोटी ३९ लाख रूपये, शहरातील विविध ठिकाणी सौर पथदिवे व सौर हायमास्ट आस्थापित करणे १ कोटी ३३ लाख रुपये, भोर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ डॉ. क्षीरसागर हॉस्पिटलशेजारी नगरपालिका रस्ता काँक्रीटीकरण ३ लाख ६० हजार रुपये, भोर नगरपरिषद हद्दीतील बजरंग आळी पाटणकर घर ते भुतकरवाडा पेव्हींग ब्लॉक १३ लाख २१ हजार रुपये, राष्ट्रीय मार्ग ते कृषी बाजार समिती रस्ता कॉक्रीटीकरण ४३ लाख ३१ हजार रुपये, अशी ४ कोटी ५२ लाखांची कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भोर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष समीर सागळे, गटनेते सचिन हर्णसकर, मुख्याधिकारी श्रीराम पवार, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, रवींद्र बांदल, राजेंद्र शेटे, गणेश पवार, नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.