भारताच्या पाठोपाठ जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत यावेळी पुन्हा एकदा विद्यमान अध्यक्ष बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्येच लढत होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये जरी अमेरिकेतील ही अध्यक्षीय निवडणूक होणार असली तरी या निवडणुकीची चर्चा गेल्या काही कालावधीपासूनच सुरू आहे. अमेरिकेतील अध्यक्ष निवडणुकीच्या कार्यपद्धतीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्या पक्षांनी आपला उमेदवार म्हणून हिरवा कंदील दाखवला असल्याने नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा याच दोन नेत्यांमध्ये लढत होणार आहे. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक पद्धती खूप किचकट आणि दीर्घ प्रकारची असली, तरी त्याच प्रकारे ही निवडणूक कोण लढवणार याची प्रक्रियासुद्धा तेवढीच गुंतागुंतीची आणि दीर्घ असते. अमेरिकेच्या लोकशाही राजकारणामध्ये प्रामुख्याने सध्या सत्तेवर असलेल्या बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष यांच्यामध्येच नेहमी लढत होत असते.
पण या दोन पक्षांकडून अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये कोण उतरणार याचा निर्णय मात्र पक्षीय पातळीवर निवडणुकीच्या माध्यमातूनच घेतला जातो. आपल्या पक्षाचा कोणता नेता अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत पक्षाचे प्रतिनिधित्व करेल हा निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेतील विविध राज्यांमधील प्रतिनिधींना असतो आणि यालाच अमेरिकेत प्रायमरी असे म्हटले जाते. या प्रायमरी निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून बायडेन यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे, तर रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. साहजिकच 2020 मध्ये ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये लढत झाली होती तशाच प्रकारची लढत आता 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सुद्धा होणार आहे. सतत तिसर्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवण्याचा विक्रम जरी ट्रम्प यांच्या नावावर होणार असला तरी या निवडणुकीमध्ये नक्की काय होईल याबाबत कोणतीही खात्री सध्या देता येत नाही.
कारण एक तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 ते 2020 या चार वर्षांच्या कालावधीमध्ये जो कारभार केला त्या कारभाराची सध्या चौकशी सुरू असून ट्रम्प यांच्या विरोधात अनेक खटले सध्या दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गंभीर स्वरूपाचे खटलेही आहेत. या खटल्यांची कारवाईसुद्धा येत्या काही महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याने या खटल्यांमध्ये कोणता निर्णय लागतो यावरही अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. वयाच्या 81व्या वर्षी डेमोक्रॅटिक पक्षाकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असलेले विद्यमान अध्यक्ष बायडेन यांनासुद्धा आपण केलेल्या कामापेक्षाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारभारावर टीका करूनच मते मागावी लागणार आहेत. 2020 मध्ये जेव्हा अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीमध्ये बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता तेव्हा ट्रम्प यांना तो पराभव मान्य नव्हता आणि पचलाही नव्हता.
त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅपिटॉलवर आंदोलकांनी हल्ला करण्याचा प्रकार घडला होता. या हल्ल्यामागे सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची चिथावणी कारणीभूत होती अशी माहितीही त्यानंतर समोर आली आहे. ट्रम्प यांची चार वर्षांची कारकीर्दही वादग्रस्त होती. ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण त्यांनी राबवले असले तरी या धोरणाच्या निमित्ताने त्यांनी जगाच्या पाठीवरील अनेक देशांना दुखावण्याचे काम केले होते. अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणाचा विचका डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये झाला होता. त्यात सुधारणा करण्याचे काम गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये जरी बायडेन यांनी केले असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेचा जो दबदबा कमी होऊ लागला आहे त्याचा विचार या दोन्ही नेत्यांना आता करावा लागणार आहे. खरे तर या वेळच्या निवडणुकीमध्ये बायडेन यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून यूनोमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निकी हेले यांच्या नावाची चर्चा होती.
पण प्रायमरी निवडणुकीमध्ये कोणत्याही राज्यांमध्ये त्यांना पुरेसा पाठिंबा मिळू शकला नाही. त्यामुळे गेल्याच आठवड्यात त्यांनी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या उमेदवारीतून आपली माघार जाहीर केली होती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग सुकर झाला होता. अमेरिकेतील निवडणूक पद्धतीप्रमाणे रिपब्लिकन उमेदवाराला अध्यक्षीय उमेदवारी मिळवण्यासाठी किमान 1215 मतांचा पाठिंबा गरजेचा असतो, तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराला 1968 मतांचा पाठिंबा गरजेचा असतो. प्रायमरी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार विद्यमान अध्यक्ष बायडेन या दोघांनीही हा कोटा पूर्ण केल्यामुळेच आता या दोघांमध्येच निवडणूक होणार, हे निश्चित झाले आहे. जुलैमध्ये होणार्या या दोन्ही राजकीय पक्षांच्या महाअधिवेशनामध्ये अधिकृतपणे डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल आणि अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.
गेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील पराभव डोनाल्ड ट्रम्प यांना अजिबात पटला नसल्याने यावेळी ते आकाशपातळ एक करून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. बायडेन प्रशासनावर जहरी टीका करणारे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणाचाच वापर करून या निवडणुकीत उतरतात का, हेसुद्धा पाहावे लागेल, तर बायडेन यांच्यासाठी प्रचाराचे मुद्दे अतिशय सोपे आहेत. कारण त्यांना फक्त डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होण्यासाठी योग्य नाहीत, हेच सांगावे लागणार आहे. ट्रम्प यांच्यावर जे विविध प्रकारचे खटले सुरू आहेत त्यात त्यांना शिक्षा झाली तरीसुद्धा ते अध्यक्षीय निवडणूक लढवू शकतात, यात कोणालाही शंका नसली तरी राजकीय दबावामुळेच आपल्यावर हे सगळे खटले दाखल करण्यात आल्याचा बचाव ट्रम्प या निवडणुकीमध्ये करू शकतात. साहजिकच नोव्हेंबरमध्ये होणारी ही अमेरिकन अध्यक्ष पदाची निवडणूक केवळ अमेरिकेसाठी नव्हे, तर जगासाठीसुद्धा महत्त्वाची ठरणार आहे.
आतापर्यंतची सर्वात चुरशीची निवडणूक म्हणूनच या निवडणुकीकडे पाहावे लागणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा चार वर्षांचा उथळ कारभार एकीकडे आणि गेल्या चार वर्षांमध्ये बायडेन यांचा सुव्यवस्थित कारभार एकीकडे, यामध्ये कोणाची पुन्हा एकदा निवड अमेरिकन नागरिक करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.