आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे या निवडणुकीतील एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते, पण त्यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मिळाला. ते कारागृहातून बाहेर आल्यानंतर कशा प्रकारे प्रचार करणार याची उत्सुकता होती. त्यानुसार त्यांनी प्रचारात वेगळेच मुद्दे उपस्थित करून धमाल उडवली आहे. सध्या प्रचारात जे मुद्दे आहेत त्याच्या हटके मुद्दे उपस्थित करत केजरीवालांनी प्रचाराचा रोखच बदलला आहे. त्यांनी अगदी जो पहिला मुद्दा उपस्थित केला, त्यातून भाजपची पळापळ झालेली पाहायला मिळाली. केजरीवालांनी म्हटले आहे की, मोदींनीच भाजपमध्ये निवृत्तीचे वय 75 इतके निश्चित केले आहे. त्यानुसार त्यांनी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह, सुमित्रा महाजन अशा ज्येष्ठांना निवृत्त केले.
पुढच्या वर्षी मोदींची 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मोदींच्याच नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागणार आहेत, मग मोदी कोणासाठी मते मागत आहेत आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटी कोण पूर्ण करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान होणार असून त्यांच्यासाठीच ते मते मागत आहेत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्यानंतर भाजपच्या नेत्यांना त्याचा लगोलग इन्कार करावा लागला आहे. पुढील पाच वर्षे मोदीच पंतप्रधान राहतील असे त्यांना सांगावे लागले आहे. या मुद्द्याच्या आधारे केजरीवालांनी एक महत्त्वाचा डाव असा खेळला की मोदींची लोकप्रियता अजूनही टिकून असल्याने ते निवृत्त होणार असल्याची आवई उठवून त्यांनी मतदारांचा रोख बदलण्याचा प्रयत्न केला आहे.
अमित शहा हे कुशल रणनीतीज्ज्ञ असले तरी त्यांच्या नावावर भाजप विजयी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अमित शहांना मतदान करण्याऐवजी इंडिया आघाडीलाच मतदान करण्याकडे मतदारांना वळवण्याचा त्यांचा हा डाव होता. तसाच डाव त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावानेही खेळला. उत्तर प्रदेशात योगींची लोकप्रियता अजूनही कायम आहे, ती तोडायची असेल तर मोदीच योगींना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकणार आहेत, जसे मोदींनी मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान, राजस्थानात वसुंधराराजे व छत्तीसगडमध्ये रमणसिंह यांना दूर केले तसेच ते आता अमित शहांचा रस्ता साफ व्हावा म्हणून योगींना हटवणार आहेत हा मुद्दा जोरकसपणे मांडत आहेत. त्या मागचे त्यांचे गणित चाणाक्षपणाचे आहे. ही हुशारी इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांना दाखवता आली नाही. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून विरोधकांना आपल्या चेंडूवर खेळणे भाग पाडण्याची कला मोदींना अवगत आहे.
केजरीवाल मात्र त्यांच्यावरही कडी करणारे नेते ठरले. मोदींनी देशात आता ‘वन नेशन, वन लिडर’ अशी संकल्पना राबवायचे ठरवले असून त्यासाठीच त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात पाठवण्याचे सत्र सुरू केले आहे. आम आदमी पक्षाच्या चार महत्त्वाच्या नेत्यांना त्यांनी तुरुंगात धाडले. स्टॅलिन आणि ममतांच्या मंत्र्यांनाही त्यांनी तुरुंगात धाडले. झारखंडमध्ये प्रभावशाली असलेले हेमंत सोरेन यांनाही त्यांनी आत टाकले. आता मोदी पुन्हा निवडून आले तर उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, स्टॅलिन अशा प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना अटक करून तुरुंगात पाठवण्याची तयारी मोदींनी चालवली असून त्यांना या देशातील विरोधी पक्षच संपवायचे आहेत, असे केजरीवाल सध्या सभांमधून सांगत आहेत. यातून प्रादेशिक पक्षांच्या कार्यकर्त्यांना चेतवण्याचे काम केजरीवाल व्यवस्थितपणे करीत असल्याचे दिसते.
इंडिया आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या नेत्यांनी नेमस्तपणे केवळ महागाई, बेरोजगारी आणि भाजपचा घटना बदलण्याचा डाव असे पारंपरिक मुद्दे घेऊन निवडणुकीचा प्रचार चालवला आहे. पण या मुद्द्यांत राजकीय वातावरण फिरवण्याची फारशी क्षमता नाही, निवडणुकीच्या प्रचारात हवा फिरवणार्या मुद्द्यांचाच वापर करावा लागतो हे तंत्र केजरीवालांनी मोदींकडूनच शिकून घेतले असावे. त्यात ते भारी पडताना दिसत आहेत. केजरीवालांचा पक्ष लोकसभेच्या केवळ 22 जागाच लढवत आहे. तरीही त्यांनी आपल्या पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित केला आहे आणि त्यातील मुद्देही चमकदार आहेत. इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर आपण त्या सरकारमध्ये सहभागी होऊ आणि या जाहीरनाम्याच्या पुर्ततेसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर केवळ तीन-चार दिवसांतच केजरीवालांनी मोठी राजकीय हलचल माजवली आहे यात वाद नाही.
केजरीवालांनी काही तरी भ्रष्टाचार केला असावा म्हणूनच त्यांना कारागृहात जावे लागले आहे असे चित्र लोकांमध्ये निर्माण झाले आहे, पण या मुद्द्याचाही त्यांनी अत्यंत प्रभावी प्रतिवाद केला आहे. त्यांनी म्हटले आहे की दिल्लीच्या एका मंत्र्याने एकाकडे पैसे मागितल्याची माहिती एका फोन रेकॉर्डिंगमधून मिळाली. त्याची माहिती मीडियाला किंवा विरोधी पक्षाला लागण्याच्या आधीच मी त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकले. पंजाबमध्येही सरकार आल्यानंतर एका मंत्र्याने अशीच पैशाची मागणी केल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधकांकडून मागणी होण्याच्या आधी आम्ही त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. पंजाबात सरकार स्थापन होऊन एक महिना व्हायच्या आत आम्ही ही कृती केली आहे, असे केजरीवालांनी आपल्या सभांमधून सांगितले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आपल्याकडे कोणत्याही प्रकारे थारा मिळत नाही हे आम्ही आमच्या कृतीतून दाखवून दिल्याचे ते सांगत आहेत आणि त्यांचा हा मुद्दा प्रभावी ठरत आहे.
तुरुंगात असूनही आपण मुख्यमंत्रिपद का सोडले नाही, याचाही ते प्रभावीपणे प्रतिवाद करीत आहेत. ते म्हणाले की मला खुर्चीचा अजिबात मोह नाही, याच्या आधी आपण केवळ 49 दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा स्वतःहून राजीनामा दिला आहे. मला तुरुंगात टाकून आमची दोन्ही सरकारे पाडण्याचा भाजपचा डाव होता, तो हाणून पाडण्यासाठीच आपण अट्टहासाने मुख्यमंत्रिपद सोडले नाही असेही ते लोकांना पटवून देत आहेत. लोकांना आपले मुद्दे प्रभावीपणे पटवून देण्याचे मोठे कौशल्य त्यांच्यात आहे. त्यांच्या या कौशल्याने आम आदमी पक्षाला निवडणुकीत नेमका किती उपयोग होईल हे 4 जूनला स्पष्ट होईलच, पण त्यांच्या अटकेमुळे त्यांच्या पक्षात आलेली मरगळ दूर करण्यात मात्र केजरीवाल या निमित्ताने यशस्वी झाले आहेत हे मात्र नक्की.