BJP Candidates List । भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या म्हणजेच उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या तब्बल ५१ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यूपीच्या उमेदवारांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. यूपीच्या 51 जागांसाठी उमेदवार जाहीर करून भाजपने सर्व प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.
यावेळी भाजप उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खासदारांची तिकिटे रद्द करू शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत असा कोणताही बदल दिसला नाही. उलट या यादीत ४७ विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्याचबरोबर ज्या लोकसभेच्या जागांवर भाजपने नवे चेहरे उभे केलेत त्या जागांवर गेल्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला होता. राजकीय अंकगणित पाहता भाजपने पहिल्या उमेदवार यादीत 100 टक्के जुन्या आणि विजयी चेहऱ्यांवरच भर दिलाय.
दिल्लीशिवाय यादीत कोणतेही मोठे बदल नाहीत BJP Candidates List ।
राजकीय विश्लेषकांनुसार, भाजपने दिल्ली वगळता इतर कोणत्याही राज्यात मोठे बदल केलेले नाहीत. वादग्रस्त विधानांमध्ये गुंतलेल्या काही खासदारांची जस कि प्रज्ञा सिंह ठाकूर आणि मीनाक्षी लेखी यांची तिकिटे कापली आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर असे घडलेले नाही. सोप्या शब्दात सांगायचे तर, भाजपच्या हायकमांडने विजयी उमेदवारांवरच बाजी लावली आहे.
यूपीमधून कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली? BJP Candidates List ।
यूपीच्या उमेदवार यादीत दिसलेल्या चार नवीन चेहऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर 2019 मध्ये या जागांवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जौनपूरमधून कृपाशंकर सिंग, आंबेडकर नगरमधून रितेश पांडे, श्रावस्तीमधून नरेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा आणि नगीनामधून ओम कुमार यांना उमेदवारी देण्यात आलीय. यूपीमधील लोकसभेच्या 80 जागांपैकी भाजप आपल्या मित्रपक्षांना काही जागा देणार आहे. या स्थितीत यूपीची पुढील यादी धक्कादायक असू शकते.