पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे गेल्या 24 तासात किमान तापमानात एक अंशाने वाढ झाल्यामुळे गारठा कमी झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा होता. बुधवारी (दि. 14) शहराच्या मध्यवर्ती भागातील किमान तापमान 13.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील कमला व किमान तापमानात वाढ होईल तर अधून-मधून ढगाळ वातावरण राहील. सकाळी उशीरापर्यंत धुके पडणार असल्याने गारठा जाणवेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील हवेची चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्रालगतच्या भागावर आहे. त्यामुळे राज्यात विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोव्यातील हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.