नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांवर अमेरिकेकडून बारिक लक्ष ठेवले जात आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार् यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये परवा (गुरुवारी) सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुकीदरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्य, एकत्रीकरण आणि संघटनात्मक अधिकारांच्या उल्लंघनाबद्दल चिंता देखील व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या जनतेकडून या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला जावा, अशी अपेक्षा असल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी नियमित वार्तालापादरम्यान सांगितले.
पाकिस्तानमध्ये अलिकडच्या काळात झालेला हिंसाचाराच्या घटना आणि प्रसार माध्यमांवरील निर्बंध, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, इंटरनेट वापराचे स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण एकत्रीकरणाच्या स्वातंत्र्याबद्दल चिंता वाटते आहे. मुक्त आणि पारदर्शक पद्धतीने, तसेच भय, दडपण आणि हिंसाचारमुक्त वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून भविष्यातील नेतृत्व निवडण्याचा पाकिस्तानी नागरिकांना अधिकार आहे, असेही पटेल म्हणाले.
दरम्यान यावेळी पाकिस्तानमध्ये जेवढी दडपशाही केली जात आहे, तेवढी आतापर्यंत कधीही झाली नसेल. त्यामुळे यावेळच्या मतदानामध्ये विश्वासार्हता किती असेल, याबद्दल शंका असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले असून या पक्षाचे निवडणूक चिन्हही काढून घेण्यात आले आहे.