नवी दिल्ली – अमेरिकेमध्ये आगामी काळात होणार् या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाभ व्हावा म्हणूनच इराक आणि सीरियामध्ये अमेरिकेकडून हल्ले केले जात आहेत, असा आरोप रशियाने केला आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाला बायडेन प्रशासन खतपाणी घालत आहे. जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या तळावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केले जात नाहीत. तर केवळ अध्यक्षीय निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून हल्ले केले जात आहेत, असे संयुक्त राष्ट्रातील रशियाचे राजदूत वासिली नेबान्झिया यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीदरम्यान केला.
अमेरिकेने गेल्या आठवड्यात इराणमधील रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित इराक आणि सीरियातील अन्य दहशतवादी संघटनांच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले आणि रॉकेटचा मारा केला.अमेरिकेने २००३ पासून इराक, सीरियामध्ये केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता. मात्र हा हल्ला बेकायदेशीर होता, असेही नेबान्झिया यांनी सांगितले.
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुका या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांची लढत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होण्याची चिन्हे दिसत आहेत.