पुणे – वर्षभर साफसफाई करून स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता साफसफाई महिला कर्मचारी हे सर्व नागरिकांचे आरोग्य नीट राहावे, यासाठी झटत असतात. त्यांच्या सन्मानासाठी पुण्यातील येवलेवाडी येथील साई द्वारिका सोसायटीमध्ये यंदाचा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी सोसायटीतील महिला सफाई कामगारांना ध्वजारोहणाचा मान देऊन सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा अनोखा प्रयत्न केला.
सफाई कामगार या वर्गाचा मान वाढविण्यासाठी साई द्वारका सोसायटीने हा अनोखा प्रयोग केला. या उपक्रमामुळे सदर महिला सफाई कामगारही आनंदून गेल्या. तसेच सोसायटीतील सदस्य सुद्धा भारावून गेले. या कार्यक्रमास मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग चौगुले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. साई द्वारिका सोसायटी मधील सभासदांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महिला सफाई कामगारांना ध्वजारोहणाचा मन देण्याच्या उपक्रमाचं कौतुकही केलं. याप्रसंगी साई द्वारिका सोसायटी सभासद, महिला सभासद तसेच लहान मुले/मुली उपस्थित होते.