एकाचा मृत्यू ः ट्रक सोडून चालक, वाहक फरार
लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून रात्री नऊ वाजता सिमेंट भरून चाललेल्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाठीमागे बसलेल्या हमालाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचा चालक व वाहक फरार झाले आहेत.
करण गुरुनाथ देडे (वय 32, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी करणचा भाऊ दिलीप देडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. करण देडे हा सिमेंटच्या गाडीवर हमाल म्हणून काम करीत होता.
देडे हा नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेला होता. सिमेंट भरून ट्रक डिलिव्हरी देण्यासाठी पुण्याच्या दिशेकडे चालला होता. पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना, चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात असलेल्या पुलावरून खाली कोसळला.
सिमेंटचा ट्रक पुलावरून खाली पडल्यानंतर तेथे जवळ असलेल्या रोहित्रावर जाऊन आदळला. तेव्हा त्या ठिकाणी खूप मोठा स्फोट झाला. या अपघातात रोहित्राचे खांब आणि रोहित्र भुईसपाट झाले. त्यामुळे महावितरणचे सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण याबाबत लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे.