मुंबई – राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, खासदार सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेण्यात आली. अजित पवार यांनी 2019 मध्ये जी शपथ घेण्यात आली होती ती पक्षनेतृत्वाच्या म्हणजेच शरद पवार यांच्या सहमतीनेच घेतली होती असा दावा यावेळी सुनील तटकरे यांनी केला.
अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाच्या घडामोडींपैकी एक आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांची उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी सुनील तटकरे यांनी हा दावा केला आहे.
अजित पवार गटाकडून विरेंद्र तुळजापूर, तर शरद पवार गटाकडून शरण जेथयानी हे युक्तिवाद करत आहे. आजची साक्ष आणि पवारांची उपस्थिती यासाठी महत्वाची आहे कारण सुनील तटकरे आपल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवार काही जणांचे ऐकतात आणि मनमानी पद्धतीने कारभार करतात म्हणून आम्ही वेगळा निर्णय घेतला होता, असे म्हणाले होते.
दरम्यान सुनील तटकरे यांना शरद पवार गटाच्या वकिलांनी आपण या मताशी सहमत आहात का 2019 मध्ये शरद पवार हे भाजपसोबत जायचे नाही या मताचे नव्हते त्यांच्या मताशी अनेकजण सहमत होते, असा सवाल केला. त्यावर सुनील तटकरे यांनी म्हटले की, त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. पुढे वकिलांनीनी अनेक प्रश्नांची पुरवणी दिली.