AFC Asian Cup Qatar 2023 : भारतीय फुटबाॅल संघ एएफसी (AFC) आशियाई कप 2023 मधून बाहेर पडला आहे. कतारमधील अल बेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या गटातील तिसऱ्या सामन्यात सीरियाने भारताचा 1-0 असा पराभव केला. भारतीय संघाचा गटातील हा तिसरा आणि शेवटचा सामना होता. या स्पर्धेत भारताला एकही गोल करता आला नाही आणि तिन्ही सामने गमावले. ब गटात भारतीय संघ तळाच्या चौथ्या स्थानावर राहिला. यासह स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
सामन्यात सीरियाच्या ओमार ख्रिबिन (Omar Khrbin) याने 76व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव आणि विजयी गोल केला. सीरियासाठी ओमारचा हा 22वा गोल होता. या विजयासह सिरियाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले असून त्याची बाद फेरीत पोहोचण्याची आशा अजूनही कायम आहे. स्पर्धेच्या या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या 24 संघांपैकी, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ आणि चार सर्वोत्तम तृतीय क्रमांकाचे संघ बाद फेरीसाठी (अंतिम -16) पात्र ठरतील. त्यासाठी सीरियाला ग्रुप ई आणि ग्रुप एफच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
⏰ FT | 🇸🇾 Syria 1️⃣-0️⃣ India 🇮🇳
The Qasioun Eagles throw themselves a lifeline in an attempt to progress to their first-ever Round of 16 with a slim win against India courtesy of Omar Khrbin’s sublime goal! ⚡
#AsianCup2023 | #HayyaAsia | #SYRvIND pic.twitter.com/vNQPztUr4e
— #AsianCup2023 (@afcasiancup) January 23, 2024
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला जगातील 91व्या क्रमांकावरील संघ सीरियाला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे होते. अनिर्णित आणि पराभवामुळे १०२व्या क्रमांकावर असलेला भारत स्पर्धेतून बाहेर पडला असता. ज्याची भीती होती तेच झाले. टीम इंडियाने हा सामना गमावला. चाहत्यांसाठी सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही.
भारताविरुद्ध झाले सहा गोल
तीन सामन्यांत सहा गोल स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची गोल सरासरी खूपच खराब होती. भारतीय संघाने आतापर्यंत तीन वेळा सीरियाचा पराभव केला आहे. 2007, 2009 आणि 2012 मध्ये त्याने या संघाविरुद्ध नेहरू चषक जिंकला होता. 2019 मध्ये, इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये दोघांमधील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. यावेळी टीम इंडिया चमत्कार करेल अशी अपेक्षा होती, मात्र निराशाच झाली.
स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी…
या स्पर्धेत सीरियाने उझबेकिस्तानसोबत 0-0 अशी बरोबरी साधली आणि ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा 0-1 असा पराभव झाला. त्याचबरोबर आज सिरियाने भारताचा 1-0 असा पराभव केला. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाकडून 2-0 असा पराभव झाला होता. उझबेकिस्तानने त्यांचा 3-0 असा पराभव केला. आणि आज झालेल्या सामन्यात सीरियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला .