पुणे – सद्यस्थितीत डेंग्यू आणि हिवताप रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. या रुग्णांवर उत्तम इलाज करून त्यांच्या आजाराची गंभीरता तसेच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णाचे व्यवस्थापन कसे करायचे, त्यासाठी त्याला अद्यावत उपचार कशापद्धतीने करावा आणि हे सर्व आपल्या सरकारी रुग्णालयात कसे मिळेल यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे येथे झालेल्या या कार्यशाळेत राज्यातील चार विभागांतील ठाणे, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयांतील बालरोगतज्ज्ञ आणि फिजिशियन सहभागी झाले होते. पाथ, गोदरेज, सीएचाआरआय आणि एफएच इंडिया या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने ही कार्यशाळा झाली. याचे उद्घाटन राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, पाथ संस्थेचे साथरोग आजारांचे संचालक डॉ. सत्यव्रत राऊतराय, डॉ. बिस्वाल, डॉ. सतीश ताजने आणि राज्य कीटक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप उपस्थित होते.
रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा या उक्तीनुसार या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यामधील इतर खाजगी तसेच सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून याचा फायदा गोर गरीब रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी करावा असे प्रतिपादन डॉ. पवार यांनी केले.
या आजारांची तपासणी कशी करावी, याविषयी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुवर्णा जोशी यांनी माहिती दिली. डॉ. दिलीप कदम यांनी कीटकजन्य आजाराची लागण झाल्यास व्यवस्थापन कसे करावे याविषयी सांगितले. डॉ. सविता कांबळे यांनी गर्भवती महिलांना या आजाराची लागण झाल्यास उपचार कसे द्यावेत याची माहिती दिली. या आजारात कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाचे महत्व डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.
साथरोगांचा इतिहास, त्याचा अभ्यास आणि व्यवस्थापन कसे करावे याविषयी नागपूर येथील सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी माहिती दिली. गंभीर हिवताप रुग्णांना उपचार कसा करावा याबाबत वायसीएमचे विभागप्रमुख डॉ. हर्षल पांडवे यांनी माहिती दिली. डॉ. छाया वळवी, डॉ. नागनाथ रेड्डीवार यांनी प्रात्यक्षिकासह माहिती दिली.