नवी दिल्ली- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रणव माय फादर: ए डॉटर रिमेम्बर्स हे पुस्तक लिहिले असून त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत त्यांना या पुस्तकाची एक प्रत भेट दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानताना मोदींचा प्रणवदांबद्दलचा आदर कमी झाला नसल्याचे म्हटले आहे.
मोदी यांची भेट घेतल्यावर शर्मिष्ठा यांनी या भेटीची छायाचित्रे एक्सवर शेअर केली असून आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की माझ्या पुस्तकाची एक प्रत मी त्यांना भेट दिली. पंतप्रधान मोदी कायमच माझ्याबाबत कनवाळू राहीले आहेत आणि बाबांप्रती (प्रणव मुखर्जी) त्यांचा आदर किंचितही कमी झालेला नाही.
Called on Hon’ble PM Shri @narendramodi ji to present him a copy of my book ‘Pranab My Father: A Daughter Remembers’. He was as kind to me as he always had been & his regards for Baba remains undiminished. Thank you Sir🙏 pic.twitter.com/WdV3SBW5w0
— Sharmistha Mukherjee (@Sharmistha_GK) January 15, 2024
दरम्यान, शर्मिष्ठा यांच्या पुस्तकाबाबत बरीच उत्सुकता आहे. त्यांच्या पुस्तकात अर्थातच कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे. त्यांनी एका ठिकाणी आपल्या पित्याची एक आठवण सांगितली आहे. त्यानुसार प्रणवदा एकदा शर्मिष्ठा यांना म्हणाले होते की, राहुल गांधी प्रश्न तर भरपूर विचारतात, मात्र अद्याप त्यांच्यात परिपक्वता आलेली नाही. तसेच तुम्ही पंतप्रधान होणार नाही का, असे एकदा शर्मिष्ठा यांनी प्रणवदा यांना विचारले होते. त्यावेळी सोनिया गांधी आपल्याला पंतप्रधान करणार नाहीत असे ते म्हणाले होते अशी आठवणही शर्मिष्ठा यांनी पुस्तकात सांगितली आहे.
दरम्यान, शर्मिष्ठा यांचा हा दावा कॉंग्रेसने फेटाळला आहे. याबाबत बोलाताना कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की कदाचित शर्मिष्ठा कुठेतरी (भारतीय जनता पार्टी) जाण्याची तयारी करत आहेत. प्रणव मुखर्जी यांना जर काही बोलायचे असते तर त्यांनी तसे थेट सांगितले असते.