पुणे – कराची थकबाकी भरली जात नसल्याने सील केलेल्या मिळकतींमधील २०२ मिळकतींचा लिलाव महापालिकेकडून केला जाणार आहे. त्यातील ३२ मिळकतींचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या मिळकतींची किंमत तब्बल २०० कोटी रुपये आहे. तर महापालिकेचा कर केवळ १६ कोटी रुपयांचा आहे.
शहरात मिळकतकराची थकबाकी तब्बल नऊ हजार कोटी रुपयांच्या घरात गेली असून, त्यातील निवासी तसेच व्यावसयिक मिळकतींची थकबाकी सुमारे ८०० कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने अशा मिळकती सील करण्यास सुरूवात केली आहे. त्यातील २०२ मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. यात आतापर्यंत ३२ मिळकतींचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे. त्याचा प्रस्ताव प्रशासनाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यानंतर पुन्हा मिळकतधारकांना पैसे भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्यानंतर जाहीर प्रकटन देऊन या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. या लिलावासाठी ५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
…तरीही मिळकत मालकांना होणार फायदा
या मिळकतींचा लिलाव होणार असला, तरी यामधून संबंधित थकबाकीदारांना फायदा होण्याची चिन्हे आहेत. मिळकतीचा लिलाव केल्यानंतर आलेल्या रकमेतून आधी महापालिकेचा कर वसूल केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित रक्कम संबंधित मिळकतधारकाच परत दिली जाईल. मात्र, त्यासाठी मिळकतधारकास सहा महिन्यांच्या आत महापालिकेस अर्ज करावा लागणार आहे. संबंधित मिळकतधारकाचा अर्ज न आल्यास ही जादाची रक्कम जप्त करून पालिकेच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे, असे कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांंनी सांगितले.