पुणे – नऊवारी आणि फेटे परिधान केलेल्या महिला आणि पारंपारिक पेहरावातील पुरुष कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात निघालेल्या दुचाकी फेरीने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या पुण्यातील कार्यक्रमांची शुक्रवारी नांदी झाली. मराठी रंगभूमीवरील अजरामर शंभर व्यक्तिरेखेच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरापासून सुरू झालेल्या दुचाकी फेरीची गणेश कला क्रीड़ा मंच येथे सांगता झाली. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या या फेरीमध्ये तीनशे दुचाकी, दहा रथांवर विराजमान ज्येष्ठ कलाकार आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या शंभर व्यक्तिरेखांच्या पेहरावातील कलाकारांचा सहभाग होता.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन, रजनी भट, जयमाला इनामदार, दीपक रेगे, माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, गिरीश ओक, शोभा कुलकर्णी, अभिजित बिचुकले यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. गणेश कला क्रीडा मंच येथे रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
काका-पुतण्या अनुपस्थित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावर असतील, अशी अपेक्षा नाट्यरसिकांना होती. मात्र, शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. आता पिंपरी-चिंचवड येथील संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात तरी काका-पुतण्या एकत्र असतील का याचे उत्तर मिळण्यासाठी नाट्यरसिकांना शनिवारची प्रतीक्षा करावी लागेल.