Team India Schedule 2024 : 2023 हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी चढ-उतारांनी भरलेले होते. दोन वेळा टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ आली, पण अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. असे असतानाही भारताने सर्वोत्कृष्ट संघ म्हणून विश्वचषकावर वर्चस्व राखले. आता भारताला 2024 मध्येही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यंदा टी-20 विश्वचषक जिंकून भारतीय संघ दशकभराचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
यंदा भारताला इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांसोबत खेळायचे आहे. बीसीसीआयने वर्षभराचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु भारतीय खेळाडूंचे जूनपर्यंतचे वेळापत्रक स्पष्ट झाले आहे. यानंतर, भारताला 2025 मध्ये होणार्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ICC कसोटी चॅम्पियनशिपसाठी द्विपक्षीय मालिका खेळायची आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार वर्षातील पहिला सामना…
2024 मध्ये भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर येथे कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारत या दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना 2024 मध्ये 3 जानेवारीपासून खेळणार आहे. हा सामना 7 जानेवारीला संपणार आहे.
अफगाणिस्तानसोबत पहिली द्विपक्षीय मालिका
11 जानेवारीपासून टीम इंडियाला अफगाणिस्तानसोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय मालिका असेल. दोन्ही देशांदरम्यान कसोटी सामना झाला असला तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्येच खेळले आहेत.
इंग्लंडसोबत कसोटी मालिका
यंदा भारतीय संघाला इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका 25 जानेवारीपासून सुरू होऊन 11 मार्चला संपणार आहे. सुमारे दोन महिने चालणारी ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
एप्रिल-मे मध्ये आयपीएलचा जलवा..
इंग्लंडसोबतच्या दीर्घ कसोटी मालिकेनंतर सर्व खेळाडू काही दिवस विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर आयपीएल सुरू होईल. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेत झटपट क्रिकेटचा थरार शिखरावर असेल.
जूनमध्ये टी-20 विश्वचषकाचा थरार…
T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 4 ते 30 जून दरम्यान होणार आहे. आयपीएलनंतर, सर्व संघांच्या बहुतेक खेळाडूंना टी -20 क्रिकेटची सवय होईल आणि या विश्वचषकात उत्साह शिगेला असेल.
जुलैपासून भारत खेळणार द्विपक्षीय मालिका…
भारतीय संघाच्या FTP चक्रानुसार, 2024 मध्ये टीम इंडिया इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळणार आहे. यातील इंग्लंडसोबतची मालिका जानेवारी ते मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर इतर देशांसोबतची मालिका जुलै ते डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे.बीसीसीआयने पुढील वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु एफटीपी चक्रानुसार हे स्पष्ट झाले आहे की भारताला वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळायच्या आहेत.
IND vs SA 2nd Test : शार्दुल ठाकूर दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? दुखापतीबाबत नवीन अपडेट आली समोर…
या मालिकांमध्ये वनडे आणि कसोटी सामन्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. कारण, 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणार आहे आणि 2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तिसरी फायनलही होणार आहे. हे लक्षात घेऊन भारताला आपली तयारी अधिक मजबूत करायची आहे.