India vs South africa 2nd Test at Newlands, Cape Town : – भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर पुर्णफिट ठरला आहे, अशी माहिती संघ व्यवस्थापनाने दिली आहे. शार्दुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत डाव्या हाताच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरीत कसोटीत खेळेल किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, त्याची वैद्यकीय चाचणी तसेच आमआरएस स्कॅन केल्यावर दुखापत फारशी गंभीर स्वरुपाची नसल्याचे स्पष्ट झाले.
त्याने दोन दिवस आरामकेल्यावर रविवारपासून भारतीय संघाच्या सराव सत्रात नेटाने सराव केला. आता त्यामुळे तो मॅचफिट असल्याचे सिद्ध झाले असल्याचेही संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि ३२ धावांनी नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे उर्वरीत कसोटीत विजय मिळवत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारतीय संघ सध्या नेटमध्ये कसून सराव करत आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. यजमान संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताची नजर दुसरी कसोटी 1-1 अशी बरोबरीत संपवण्याकडे असेल, तर दक्षिण आफ्रिकेची नजर टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याकडे असेल.