पुणे – नवीन तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, हंगामाच्या सुरुवातीला सर्व तांदळाच्या भावात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीस बंदी असताना हंगामाच्या पहिल्या टप्यात तांदळाच्या भावात वाढ झाली. यंदा काही राज्यात तांदळाची लागवड कमी झाली आहे, तसेच पाऊस कमी झाल्याने तांदळाच्या भावात वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी काही राज्यात तांदळाला भाव चांगले मिळाले होते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी स्थानिक भागात मागणी असणाऱ्या तांदळाचीच लागवड केली. काही राज्यांत पेरणी लवकर झाली. पाऊसही चांगला झाला. मात्र, काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने भाताचे नुकसान झाले. काही राज्यांत पावसाने ओढ दिल्याने प्रतवारीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील जयराज ग्रुपचे संचालक तांदूळ व्यापारी धवल शहा यांनी दिली.
यंदा मावळ तालुक्यातील इंद्रायणी तांदूळ, विदर्भातील नागपूर, भंडारा परिसरातील कोलम या तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंद्रायणी तांदळाला प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजार रुपये भाव मिळाले होते. यंदा उत्पादन कमी झाल्याने साडेपाच ते साडेसहा हजार रुपये मिळाले आहेत.
कोलम तांदळाला यंदा प्रतिक्विंटल साडेपाच ते साडेसहा हजार रुपये असे भाव मिळाले आहेत. मध्यप्रदेशातील सुरती काेलम, एचएमटी कोलम तांदळाचे प्रतिक्विंटलचे भाव सात ते साडेसात हजार रुपये आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक ते दीड हजार रुपयांनी भाव जास्त मिळाले आहेत. तर, आंबेमोहाेरचे भाव साडेपाच ते साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल असे स्थिर आहेत.
बासमती महागच
उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणात बासमती तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला बासमती तांदळाला डिसेंबरमध्ये दहा ते अकरा हजार प्रतिक्विंटल दर मिळाले होते. यंदा बासमतीला प्रतिक्विंटल साडेअकरा ते तेरा हजार क्विंटल असे भाव मिळाले आहेत. पारंपरिक बासमतीच्या दरवाढीमुळे ११२१ बासमती, पुसा बासमती, बासमती तिबार, दुबार, मोगरा, बासमती तुकडा, कणी या प्रकारच्या तांदळाच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आंधप्रदेश, कर्नाटकातील मसुरी, डॅश, परिमल, सोनामुसरी या तांदळाच्या दरात वाढ झाली आहे.
“मागील वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव तेजीत आहेत. यंदा पावसामुळे सर्व प्रकारच्या तांदळाचे नुकसान झाले आहे. परिणामी, उत्पादन कमी होणार आहे. यंदा प्रक्रिया केलेल्या स्टीम राइस या प्रकाराला मोठी मागणी आहे, तसेच बिगर बासमती तांदळाला मागणी वाढली आहे.” – धवल शहा, तांदळू व्यापारी व निर्यातदार