पुसेसावळी – स्वयंप्रेरणेतून मुले अधिक शिकतात त्यातून मिळणारा आनंद ही अधिक असतो. त्यामुळे मुलांना शिकण्यास प्रेरित करा. जागतिक स्विकार्यता असणारे मुल तयार करणे आज काळाची गरज आहे. त्यामुळेच जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार शिक्षकांच्या पर्यंत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे मत कडेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी व्यक्त केले.
सोहोली येथील लोकनेते मोहनराव कदम विद्यालयात अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन या तालुकास्तरीय शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये जागतिक स्वीकार्यता असणार मूल कशा पद्धतीने तयार करता येईल. विद्यार्थ्यांची अध्ययन गती तिप्पट कशी करता येईल. स्वयंप्रेरणेतून मुलं कशी शिकतात. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा वृत्तीचा सन्मान कसा करावा. सेल्फी विथ सक्सेस मधून विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा देता येईल. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक व भावनिक विकास कसा साधता येईल. अध्ययन गती कमी मध्यम व अधिक असणारे अर्थात असर,न्यास व पिसा पातळीवरील मुलांना अध्यापन कसे करावे. यासह अनेक नवनवीन बाबींची प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना माहिती देण्यात आली.
हे प्रशिक्षण शिक्षकांच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांसाठी अध्ययन गती वाढवणार आहे. हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्याचा संदेश या प्रशिक्षणातून मिळाला. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवून नक्कीच पिसा पातळीवरील मुले तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थीनी दिला.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख महादेव माळी, विश्वजित पवार, मंगेश बनसोडे, विषयतज्ज्ञ नानासाहेब कदम, वृषाली दाईंगडे, रंजना घोरपडे, संगिता यादव परिश्रम घेत आहेत.