पुणे – गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. त्यावर मात करण्यासाठी व रुग्णांना उत्तम प्रतीचे उपचार ते पण माफक दरात उपलब्ध करून दिले जातील. मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून पेट स्कॅन आणि त्यापुढील काळात रेडिएशनचे मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक नानावाडा येथे मुक्ताताईंच्या प्रयत्नातून साकारलेल्या क्रांतिकारक संग्रहालयाचे लोकार्पण आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांच्याकडे हे संग्रहालय पालिकेकडून चालवण्यासाठी व देखभालीसाठी सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या उपस्थितीत हस्तांतरित करण्यात आले. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजप नेते सुनील देवधर, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार जगदीश मुळीक व सिने अभिनेता क्षीतिज दाते तसेच टिळक कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी मुक्ताताईंच्या सामाजिक व राजकीय कामांचा गौरव करताना पुणे शहरात अशा प्रकारच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याची गरज आहे. पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवात वाढ करण्याचे तसेच पुढील पिढीपुढे हा गौरवशाली इतिहास मांडण्याची गरज आहे, असे सांगितले. यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश टिळक यांनी केले.