prakash ambedkar – राज्य मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठा आरक्षण देण्यास आपला विरोध नाही. परंतु मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तर यावरून राज्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे.
दरम्यान या संदर्भात आज पुण्यात माध्यमांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्या ओबीसी भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,’आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे’
भुजबळ म्हणाले होते की,’मराठवाड्यातील कुणबी असून प्रमाणपत्र मिळत नाही हा मूळ मुद्दा होता. सरसकट मराठा आरक्षण द्या ही मागणी आम्ही मान्य करू शकत नाही. मराठवाड्यातील वंशावळ चेक करून कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीमध्ये येतात. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास त्याला आपोआप ओबीसी आरक्षण मिळते. कुणबी नोंद असल्यास प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही, पण सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळ पुढे म्हणाले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती नेमली त्याला हरकत नाही. शिंदे समितीला राज्यभर पुरावे पडताळण्याची संमती नव्हती. सर्वच प्रमाणपत्रावर कुणबी लिहिले जात आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू झाला. त्यावेळी २२५ जाती होत्या आज ती संख्या ३७५ झाली आहे. जात प्रमाणपत्र घ्या आणि कुणबीमध्ये या आम्ही कुणालाच अडवलं नाही. खाडाखोड करुन जी कागदपत्रं दाखवली जात आहेत त्यावर आमचा विरोध आहे.”