पारगाव – राज्यात सध्या पडलेल्या दुधाच्या दरामुळे दूध व्यवसाय मोडकळीस आला असून, शेतकरी कर्जबाजारी झाला असल्याने आज (मंगळवारी) पारगाव व पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकर्यांच्या वतीने दौंड तालुक्यातील पारगाव या ठिकाणी दूध दरवाढ झालीच पाहिजे यासाठी रस्त्यावर दूध ओतून प्रति लिटर 40 रुपये बाजार देण्याची मागणी यावेळी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतात खत, गावात पत, अन घरात बरकत ही त्रिसूत्री साधणार दुग्ध व्यवसाय आता आतबट्याचा झाला आहे. कृषी प्रधान महाराष्ट्रातील शेतीला जोडधंदा म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दूध धंद्याला पसंती दिली आहे; परंतु या महागाईच्या काळात व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर प्रतिलिटर 10 ते 11 रुपयेने कमी झाले असून खाद्याचे दर मात्र 30 ते 35 टक्याने वाढल्याने.
दूध व्यवसाय तोट्याचा झाला असून शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. काही वेळ रस्ता अडवून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन रस्त्यावर दूध ओतण्यात आले. व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सयाजी ताकवणे, खरेदी विक्री संघाचे संचालक नानासो जेधे, राजाराम बोत्रे, अमोल बोत्रे, हभप विश्वास महाराज ताकवणे, दशरथ ताकवणे, महेश ताकवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर वैभव बोत्रे यांनी आभार मानले. दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आहे. शासनाचा दूध दर हा 34 रुपये असून शेतकर्यांना सध्या 26 रुपये इतकाच दर मिळत आहे. शासनावर अनेक मोठं मोठ्या खाजगी दूध संघाचा दबाव आहे. दरवाढ झाली नाही तर शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या साठी सर्वांनी गट तट न पाहता एकत्र आले पाहिजे.
-पोपटराव ताकवणे, श्री रेणुकादेवी दुग्ध उत्पादक संस्था
पारगाव : न्हावरे – चौफुला रोडवर दूध ओतून निषेध करताना शेतकरीबांधव