पुणे – गेल्या महिनाभरापासून विशेषत: दिवाळीनंतर पुण्याच्या हवेची एकूणच गुणवत्ता ढासळली होती. अतिशय खराब या वर्गात ती नोंदवली गेली होती. पण, गेल्या ४८ तासांत शहर- उपनगरांत झालेल्या पावसाने शहरातील हवा समाधानकारक पातळीवर नोंदवली गेली आहे.
दिवाळी काळात यंदा फटाक्यांचे प्रमाण अधिक राहिले. त्यातच औद्योगिक कारखाने, वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुराच्या प्रमाणामुळे शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण वाढीस लागले होते. इतकेच काय, तर हवेची गुणवत्ता कायम राहण्यासाठी आणि प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमावली लागू करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. असे असताना, गेल्या दोन दिवसांत शहर-उपनगरांत झालेल्या पावसाने हवेची गुणवत्ता सुधारली आहे. हवेत मिसळणारे पीएम-१० आणि पीएम-२.५ ही धुलिकणही पाण्यामुळे वाहून गेल्याने पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच एक्यूआय अचानक सुधारला आहे.
शहर आणि एक्यूआय
दिल्ली – ३५४
पुणे – ५६
मुंबई – ४७
अहमदाबाद – ३९
अशी आहेत हवा गुणवत्तेची मानके
शून्य ते ५० – उत्तम
५० ते १०० – समाधानकारक
१०१ ते २०० – मध्यम
२०१ ते ३०० – खराब
३०१ ते ४०० – अतिशय खराब
४०१ ते ५०० – गंभीर
माहिती स्रोत : सफर इंडिया