नवी दिल्ली – छत्तीसगडच्या निवडणुकीपुर्वी महादेव ॲपचे भ्रष्टाचाराचे प्रकरण राजकीयदृष्ट्या खूप तापले होते. या प्रकरणात एका कुरिअर व्यवसायिकाला ईडीने अटक केली होती व त्याने आपण राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना ५०८ कोटी रूपये दिल्याची कबुली ईडीकडे दिली असल्याची माहिती ईडीनेच एका निवेदनाद्वारे जाहीर केली होती. पण अमित दास नावाच्या या कुरिअर व्यावसायिकाने तुरूंगातूनच ईडीला पत्र पाठवून याचा इन्कार केला आहे.
आपण कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा राजकीय कार्यकर्त्याला कधीही पैसे दिलेले नाहीत असे त्याने या पत्रात ईडीच्या प्रमुखांना कळवले आहे. आपल्याला यात खोटेपणाने गुंतवले गेले आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याकडून ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी मसुद्यावर सह्या घेतल्या. आपल्याला इंग्रजी समजत नाही. त्यामुळे त्यांनी या मसुद्यात काय लिहीले हे कळले नाही आणि त्यांनीही त्याचा खुलासा केला नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जोरजबरदस्ती करून माझी त्यावर स्वाक्षरी घेतली असे असिम दास याने म्हटले आहे.
महादेव ॲपचा प्रर्वतक शुभम सोनी हा आपला बालपणीचा मित्र आहे. त्याच्या सांगण्यावरून मी त्यालाभेटायला दोनवेळा दुबईला गेलो होतो. त्याला छत्तीसगड मध्ये बांधकाम व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्याने मला मदत मागितली होती. त्यानुसार मी त्याला ही मदत करायची ठरवले होते. या खेरीज आपला या विषयाशी काहीही संबंध नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनीच माझ्या कार मध्ये काही कोटी रूपयांची रक्कम ठेऊन मला खोटेपणाने यात अडकवले आहे असेही त्याने म्हटले आहे.
या आरोपामुळे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यावर ऐन निवडणूक काळात मोठीच आफत आली होती. भाजपनेही हा निवडणुकीचा मुद्दा बनवला होता. त्यांनी महादेवालाही सोडले नाही असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनीही प्रचार सभेत केले होते; वास्तविक महादेव ॲपचे प्रकरण छत्तीसगड सरकारनेच उघड केले होते व या संबंधातील अनेकांना अटक करून त्यांची पंधरा कोटींची मालमत्ता जप्त करून त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवला होता. या ॲपवर बंदी घालावी अशी मागणीही बघेल यांनी केंद्र सरकारकडे केली होती. पण त्यावर केंद्राने कोणताही कारवाई त्यावेळी न करता बघेल यांच्यावरच हा आरोप केला होता.