अर्ज पडताळणीस महाविद्यालयांची टाळाटाळ
पुणे – पुणे विभागीय शिक्षण सहसंचालकांनी वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, हे पुन्हा समोर आले आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी 4 हजार 101 विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याने या विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती गमावण्याची वेळ येणार आहे.
“महाडीबीटी’ पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जाची पडताळणी महाविद्यालय स्तरावरुन करण्यासाठी वेळोवेळी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या जातात. मात्र, पुणे विभागातील महाविद्यालय, विद्यापीठ, संस्था स्तरावर सन 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23 या वर्षांमधील शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी प्रलंबितच आहेत.
“महाडीबीटी’ पोर्टलवरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जावर रोजच्या रोज कार्यवाही करणे आवश्यक आहे. पण, दुसऱ्या हप्त्याचेही अर्ज प्रलंबितच आहेत. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाहीत. पहिल्या हप्त्यासाठी 779, तर दुसऱ्या हप्त्यासाठी 3 हजार 322 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.
अर्जात काही त्रुटी असल्याच त्याची पूर्तता करुन ते निकाली काढण्याला महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे या आकडेवारीवरून पुन्हा समोर आले आहे.
महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबितच राहणार नाहीत, याची गांभीर्याने नोंद घेणे गरजेचे आहे. प्रलंबित अर्जांबाबत भविष्यात उद्भवणाऱ्या प्रश्नास संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव, महाविद्यालयांचे प्राचार्यच जबाबदार असतील.
– डॉ. केशव तुपे, उच्च शिक्षण सहसंचालक, पुणे विभाग