बॅंकॉक – म्यानमारचे सैन्य आणि तेथील सशस्त्र बंडखोरांमधील संघर्ष आणखीनच वाढला असून देशाच्या पूर्वेकडील भागातील एका गावावर सैन्याच्या लढाऊ विमानांनी केलेल्या बॉम्बफेकीमध्ये किमान 11 नागरिक ठार झाले आहेत. मृतांमध्ये 8 लहान मुलांचाही समावेश आहे.
म्यानमारमधील विरोधी गट आणि हल्ला झालेल्या परिसरातील स्थानिक नागरिकांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. म्यानमारच्या दक्षिणेकडील चिन प्रांतातल्या मातुपी तालुक्यातल्या वुइलू गावामध्ये हा बॉम्बहल्ला करण्यात आला होता. म्यानमारमधील लष्करी राजवटीने या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
दोनच दिवसांपूर्वी चिन प्रांतातील चिन नॅशनल फ्रंट या बंडखोरांच्या गटाने भारताच्या सीमेजवळचे रिखावदा नावाचे गाव ताब्यात घेतले होते. त्यानंतर बंडखोरांनी स्थापन केलेल्या “नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट’ या समांतर सरकारमधील मंत्र्याने लष्करी विमानांनी केलेल्या बॉम्बफेकीची माहिती वृत्तसंस्थेला दिली.
या हल्ल्याबाबतचे वृत्त समजताच संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार प्रमुखांनी एक निवेदन प्रसिद्धीस देऊन म्यानमारमधील सर्व संबंधितांना संयमाचे आवाहन केले आहे.
म्यानमारमधील लष्कराने 2021 च्या फेब्रुवारीमध्ये सत्ता ताब्यात घेतल्यानंतर स्थापन झालेल्या लष्करी राजवटीकडून लोकशाही समर्थक बंडखोरांवर आणि वांशिक सशस्त्र गटांवर सतत असे हल्ले केले जात असतात. अशा हल्ल्यांमध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.