मुंबई – कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) निर्माण केल्या जाणाऱ्या डीपफेक्स (Deepfake) तंत्रांच्या बनावट व्हिडीओच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले की डीपफेक ओळखण्यासाठी आणि त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे.
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Actress Rashmika) असाच एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असताना त्यावर अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटींकडून टीका होत आहे. त्यातून डीपफेकचा मुद्दा समोर आला आहे.
रश्मिका मंदाना सारख्या ख्यातनाम व्यक्ती आणि काही आंतरराष्ट्रीय राजकारण्यांनी डीपफेक हल्ल्यांचा फटका सहन केला आहे आणि त्यामुळे यातून यापुढे सामान्य माणसाला बदनामीही सहन करावी लागू शकते. त्यातून त्याचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते म्हणून अशा प्रकारावर कडक उपाययोजना केली पाहिजे असे सावंत यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारने या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या deepfake आक्रमणावर तात्काळ समिती नेमून यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नियमावली बनवणे अभिप्रेत आहे. तसेच deepfake आहे हे ओळखून सत्य समोर आणण्याची यंत्रणा बनवणे आवश्यक आहे.
हे आक्रमण आता रश्मिका मंदानासारख्या सेलिब्रिटी व काही… https://t.co/Kc3oWxUoff— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 11, 2023
अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे राजकीय क्षेत्रात अराजकता निर्माण होऊ शकते, आधीच सोशल मिडीयावरील अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सावंत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना टॅग करत त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करून प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले.