World Cup 2023 India vs Sri Lanka Match : जसप्रीत बुमराहने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध 2023 विश्वचषकातील 33 व्या सामन्यात एक मोठी कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निशांकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. निशांकला बाद करून बूम-बूम बुमराहने एक विशेष स्थान प्राप्त केले आहे.
बुमराहच्या नावावर मोठी कामगिरी…
जसप्रीत बुमराह 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत डावातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आजपर्यंत बुमराहच्या आधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहने निशांकला पॅव्हेलियनमध्ये पाठवून ही कामगिरी केली. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत बुमराहची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 15 बळी घेतले आहेत.
भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय…
शानदार फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाने विश्वचषकात श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव केला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. भारताने 16 वर्ष जुना विक्रम मोडला आहे. या संघाने 2007 मध्ये बर्म्युडाचा 257 धावांनी पराभव केला होता. भारताने या विश्वचषकात सलग 7 वा सामना जिंकून उपांत्य फेरीतील पहिले स्थान निश्चित केले आहे. भारताचे 7 सामन्यांतून 14 गुण झाले असून संघ स्पर्धेत अपराजित आहे.
#CWC23 #INDvSL : टीम इंडियाचा दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश; श्रीलंकेचा विक्रमी धावांनी केला पराभव …
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 विकेट गमावत 357 धावा केल्या. भारताकडून फलंदाजीत शुभमन गिलने 92, विराट कोहलीने 88 आणि श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव 19.4 षटकात 55 धावांत आटोपला. टीम इंडियाकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने 5, मोहम्मद सिराजने 3 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली. फिरकीपटू रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.